पुणे : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने अखेर रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. मंत्रालयाकडूनकडून तो रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असून, तेथे मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे पडणार आहेत.
रेल्वेचा मार्ग ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील लोणावळा, देहू सासवड या भागातून जातो. मात्र ‘पीएमआरडी’च्या विकास आराखड्यात तो प्रस्तावित करण्यात आला नव्हता. विकास आराखड्यात तो समाविष्ट करावा, यासाठी रेल्वे कॉर्पोरेशनने यापूर्वी ‘पीएमआरडीएला पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित विकास आरखड्यात हा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली. परंतु हाच मार्ग फुरसुंगी आणि लोहगावच्या हद्दीतूनदेखील जातो. फुरसुंगी येथे महापालिकेडून दोन नगररचना योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, त्यापैकी एका नगररचना योजनेचे प्रारूप महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, फुरसुंगीमधील दुसऱ्या नगररचना योजनेचे काम अद्याप सुरू आहे. ही दोन गावे वगळता उर्वरित गावांच्या विकास आराखड्याचे काम महापालिकेकडून अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र महापालिकेने त्यास मान्यता दर्शविल्यानंतर सल्लागार कंपनीकडून या रेल्वेच्या मार्गिकेच्या आराखड्याचे काम पूर्ण करून तो कॉर्पोरेशनकडे सादर केला होता. मात्र कॉर्पोरेशनकडून त्यांच्या छाननीचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर कॉर्पोरेशनकडून तो आराखडा रेल्वे मंत्रायलयाकडे सादर करण्यात आला आहे.