मुंबई –
मुंबईसह उपनगरात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांत आणि त्यांच्या नातेवाईकांत चिंतेचे वातावरण आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना ब्लड बँकांमध्ये रक्ताचा शोध घेताना झगडावे लागत आहेत. मुंबईतील अनेक ब्लड बँकांनी त्यांच्याकडे मोजक्याच ब्लड ग्रुप्सचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले. रक्ताच्या या तुटवड्यामुळे नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे.
दिवाळीमुळे मर्यादित स्वरूपात रक्तदान मोहीम राबवण्यात आली होती. त्यामुळे मुंबई शहरात आणि आसपासच्या भागांमधील रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. रविवारी बीवायएल नायर रुग्णालय वगळता अनेक ब्लड बँकांमधील रक्ताचा साठा हा शून्यावर आला होता. या रक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भांडूपचे रहिवासी असिफ शेख यांच्या मातोश्री फरिदून (५७) यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्रक्रियेसाठी फरिदून कळव्यातील आनंद दिघे हार्टकेअर सेंटरमध्ये दाखल आहे. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ए निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्या रक्ताची आवश्यकता आहे. असिफ यांनी रविवारी २० पेक्षा अधिक ब्लड बँकांमध्ये संपर्क साधला. या ब्लड बँकांनी असिफ यांना सांगितले की, आमच्याकडे रक्त शिल्लक नाही.
मुंबई शहरासह उपनगरातील ब्लड बँकांत रक्ताचा तुटवडा
