मुंबई – मुंबई विमानतळाजवळील इमारतींचा पुर्नविकास रखडलेला असून त्यामुळे येथील लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विमानतळाच्या फनेल झोन या भागातील झोपडपटट्यांच्या पुर्नविकासासाठी येथील प्रतिबंध हटवावेत अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. आर. नायडू यांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहीले असून या भागातील इमारतींच्या उंचींवरील प्रतिबंध हटवावेत अशी मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई विमानतळाच्या बांधणीच्या पूर्वीपासून या ठिकाणी इमारती आहेत. त्या विमानतळाच्या फनेल झोन म्हणजे उड्डाण व उतरण्याच्या कक्षेत येतात. त्यामुळे या इमारतींच्या उंचींवर बंदी आहे. या मुळे विलेपार्ले, सांताक्रुझ, कुर्ला आणि घाटकोपर पश्मिम या भागातील इमारतींचा पुर्नविकास रखडला आहे. त्याने या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत आहे. या नियमांमध्ये सुधारणा करुन या इमारतींच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा करुन द्यावा. त्याचप्रमाणे येथील असंख्य झोपडपट्ट्यांची सुधारणा त्याचप्रमाणे पुर्नविकासही रखडला आहे. विमानतळाच्या सुरक्षेविषयी कोणतीही तडजोड करणे योग्य नाही हे आम्हीही मानतो मात्र फनेल झोनच्या नियमांमध्ये सुट देऊन या भागातील नागरिकांना दिलासा देण्यात यावा. वर्षा गायकवाड या मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष असून उत्तर मध्य मुंबईतील खासदार आहेत. या भाग त्यांच्या मतदारसंघात येत असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.