मुंबई विद्यापीठात ‘बीबीए’ ‘बीसीए’ अभ्यासक्रम रखडले

मुंबई – मुंबई विद्यापीठाकडे अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमापासून वंचित राहिले आहेत. मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यासाठी गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून बीबीए, बीसीए आणि बीएमएस हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच ‘एआयसीटीई’ने आपल्या अखत्यारित आणण्याचा निर्णय घेतला होता. हे अभ्यासक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयांना ‘एआयसीटीई’ची मंजुरीही अनिवार्य करण्यात आली. त्यानंतर ‘एआयसीटीई’च्या परिपत्रकानुसार या अभ्यासक्रमांसाठी बहुसंख्य व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी आवश्यक शुल्क भरून अर्ज केले होते. हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यास मान्यताही मिळाली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाकडे मान्यतेसाठी रितसर शुल्क भरून अर्ज सादर करण्यात आले. परंतु या अभ्यासक्रमांसाठी संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही, असे मुंबई विद्यापीठाकडून संबंधित महाविद्यालयांना कळवले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top