मुंबई- मुंबईकरांची ‘जीवनरेखा’ मानल्या जाणाया लोकलची रचना लवकरच बदलणार आहे. त्यासाठी नवीन रचनेच्या लोकल तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. नव्या लोकलमध्ये ऑक्सिजन पातळी नियंत्रित ठेवणारी यंत्रणा असणार आहे. त्यामुळे नव्या लोकलमध्ये अधिक खेळती हवा राहणार आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रेल्वे प्रकल्पांसाठी केलेल्या तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ५५ हजार कोटींची तरतूद केली आहे. नवीन प्रकल्पांसाठी ४ लाख ६० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ७७८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मुंबईतील नवीन टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर उपनगरी लोकलच्या फेऱ्यांमध्येही १० टक्के वाढ होणार आहे. तसेच लोकल गाडया अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने नवीन रचनेच्या लोकल तयार करण्याचे काम सुरु आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये एक यंत्र लावण्यात आले आहे. त्या माध्यमातून ट्रेनमधील ऑक्सिजन पातळी नियंत्रणात राहते. तशीच यंत्रणा नव्याने तयार करण्यात येत असलेल्या लोकलमध्ये लावण्यात येणार आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.
मुंबई लोकलची रचना बदलणार फेऱ्यांमध्ये १० टक्क्यांनी वाढ !
