मुंबई- कुलाबा – वांद्रे- सीपझ भुयारी मेट्रो- ३ मार्गावरील स्थानकामध्ये आता लवकरच फूड स्टॉल,एटीएम,तिकीट व्हेंडिंग मशीन आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मेट्रो लाईन-३च्या २७ स्थानकांवर सुमारे १.३ लाख चौरस फुट व्यावसायिक जागा यशस्वीरित्या वितरित केल्या आहेत. या जागा विविध व्यावसायिक उद्देशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या स्थानकांवरील वितरित जागांमध्ये मोठ्या फ्लोअर प्लेट्सपासून ते लहान छोट्या दुकानांपर्यंत विविध प्रकारची जागा उपलब्ध आहे. सुमारे ४०,००० चौरस फुटांच्या मोठ्या फ्लोअर प्लेट्सपासून १०० चौरस फुटाच्या लहान दुकानांचा समावेश आहे, जे विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात.या व्यावसायिक जागा खुल्या निविदा प्रक्रियेने वितरित केल्या जात आहेत. त्यामुळे अधिक प्रमाणात व्यावसायिक संधी निर्माण होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे मेट्रो प्रवाश्यांना तिकीट दर वाजवी ठेवून विविध सेवासुविधा मिळविण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहेत.
या निविदांमध्ये टाटा ट्रेंट, इंडिया रिटेल अँड हॉस्पिटॅलिटी,नमन ग्रुप, अमर टी, वारणा सहकारी, रोजिअस रिटेल, मिस्टिकल ग्रुप, डेलिसिया फूड्स आणि चितळे बंधू यांसारख्या प्रमुख उद्योगसमूहांनी भाग घेतला होता. या व्यावसायिक जागा मेट्रो-३ स्थानकांच्या महत्त्वाच्या जागी असल्याने व भविष्यात या मार्गावरील वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहाचा भरघोस प्रतिसाद मिळाला.