मुंबई – एसटी महामंडळाच्या ‘शिवनेरी’ बसचा मुंबई-पुणे प्रवास आता स्वस्त होणार आहे. या मार्गावर ईलेक्ट्रिक एसटी बस अर्थात ‘ई-शिवनेरी’ सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १ मेपासून ई-शिवनेरी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.या ई-शिवनेरीचे तिकीट दर सध्याच्या तिकीट दराच्या तुलनेत कमी असतील. डिझेलच्या तुलनेत ईलेक्ट्रिक बसचा परिचालन खर्च (ऑपरेटिंग कॉस्ट) कमी आहे.
देशभरातील राज्य परिवहन महामंडळामध्ये फेम योजनेंतर्गत ईलेक्ट्रिक बसचा समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिचालन खर्च कमी असल्याने त्याचा लाभ प्रवाशांना मिळावा, यासाठी मुंबई-पुणे शिवनेरीचे तिकीट दर ७० ते १०० रुपयांनी कमी करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासाचे तिकीट ५१५ रुपये आहे. महामंडळाचा प्रीमियम ब्रँड म्हणून शिवनेरी ओळखली जाते. व्होल्व्हो श्रेणीतील आरामदायी, वातानुकूलित, वेगवान प्रवासासाठी मुंबई-पुण्यातील प्रवासी शिवनेरीला प्राधान्य देतात. ईलेक्ट्रिक बसमुळे पर्यावरणाची हानीसुद्धा होणार नाही. प्रदूषण होणार नसल्यामुळे पर्यावरण चांगले राहण्यास मदत होणार आहे.