पुणे – मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील पर्यायी रस्त्याचे (मिसिंग लिंक) काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पर्यायी रस्त्याच्या कामात खराब हवामानामुळे काही अडथळे येत असले तरी काम सुरू ठेवण्यात आले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या पर्यायी रस्त्यामुळे मुंबई- पुणे प्रवास १३.३ किलोमीटरने कमी होणार आहे.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे लोणावळा येथे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येतात आणि पुढे खंडाळा एक्झिटवर एकमेकांपासून वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा रस्ता सहा पदरी आहे. या भागामध्ये घाट आणि चढ-उतार जास्त आहेत. येथे पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे मुंबईकडे येणारा डोंगरालगतचा एक मार्ग पावसाळ्यात बंद ठेवावा लागतो. या समस्येवर तोडगा म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव हा १३.३ किलोमीटर लांबीच्या पर्यायी मार्गाचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील मिसिंग लिंक जूनपर्यंत वाहतुकीला खुला होणार
