मुंबई- आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमधील मुदत ठेवी प्रशासनाने मोडल्याची बाब समोर आली आहे.पालिका प्रशासनाने राज्य सरकार,बेस्ट आणि एमएमआरडीएला निधी देण्यासाठी या ठेवी मुदतीआधीच मोडल्या आहेत.मात्र पालिकेतील कामगार संघटनांनी अशा ठेवी मोडण्यास कडाडून विरोध केला आहे.त्यामुळे आता कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी आणि निवृत्तीवेतन निधीच्या ठेवी मोडणार नसल्याचे आश्वासन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामगार संघटनांना दिले आहे.
गेल्या पाच वर्षांत २,३६० कोटींच्या मुदत ठेवी मुदतपूर्व मोडल्याची बाब माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविलेल्या अर्जातून समोर आली आहे. यामध्ये बेस्टला ७५६ कोटी ५० लाख,एमएमआरडीएला ९४९ कोटी ५० लाख रुपये मुदत ठेवी मोडून दिले आहेत. ऑगस्ट २०१९ आणि मार्च २०२२ मध्ये या बँकेतील ठेवी मोडल्या आहेत.तसेच २०१६ मधील निर्णयानुसार पालिकेला मेट्रो प्रकल्प खर्चाचा २५ टक्के भाग द्यावा लागला आहे.दरम्यान आता यापुढे भविष्यनिर्वाह निधी अणि निवृत्ती वेतनाच्या ठेवी इतरांना देण्यासाठी मोडल्या जाणार नाहीत. तसेच पालिका कामगार आणि कर्मचार्याला सेवानिवृत्तीच्या दिवशीच देय रक्कम दिली जाईल आणि पदोन्नतीची पदेही लवकरच भरली जातील,असेही पालिका आयुक्तांनी कामगार संघटनांना सांगितले आहे.