मुंबई
मुंबई ते सिंधुदुर्ग अलायन्स एअरची सेवा अचानक रद्द करण्यात आली आहे. अचानक रद्द झालेल्या सेवेचा फटका गणेशोत्सवासाठी विमानाने कोकणात जाण्यासाठी निघालेल्या कोकणवासीयांना प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. या विमानात ५२ प्रवासी होते. विमान रद्द झाल्यानंतर प्रवाशांनी विमानातील कर्मचाऱ्यांना घेरले. तातडीने विमान सोडण्याची मागणी केली आहे. विमान सोडले नाही तर घरी परतणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली.
आज सकाळी ११.३० वाजता मुंबई विमानतळावरील टी-2 टर्मिनलवरून हे विमान सिंधुदुर्गसाठी रवाना करण्यात येणार होते. परंतु अचानकपणे ते रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. या विमान प्रवास करणाऱ्यांमध्ये वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश होता. यातील काही प्रवाशांना मधुमेह (डायबेटिस) आणि अन्य व्याधी होत्या. एअरलाईनकडून जेवण दिले गेले नाही. सकाळी ६ घरातून निघालेले प्रवासी खूप काळ ताटकळत बसले होते.