तिरुअनंतपुरम – मुंबईहून तिरुअनंतपुरमला आलेल्या एअर इंडियाच्या ६५७ या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. विमान तिरुअनंतपुरमला पोहोचल्यानंतर या धमकीची माहिती वैमानिकाने दिली. त्यानंतर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले व विमानाला दूर नेऊन तपासणी करण्यात आली. या प्रकरणानंतर तिरुअनंतपुरम विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली.
या प्रकरणी विमानतळ प्रधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. त्यानंतर विमानातील १३५ प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. हे विमान दूर आसोलेशन बे मध्ये नेण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात आली. ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानातील प्रत्येक प्रवाशाच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली असून चिंतेचे कारण नाही. गेल्या तीन महिन्यात विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा येण्याची ही सहावी वेळ आहे.