मुंबई, ठाण्यात दहीहंडी फोडताना १२४ गोविंदा जखमी

मुंबई – मुंबईसह ठाण्यात काल दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला.त्याचवेळी काही ठिकाणी मानवी थरावरून जमिनीवर कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याने या सणाला गालबोट लागले.मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत १०७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली.यापैकी १४ जण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमींपैकी ६२ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. ठाण्यातही १७ गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली आहे.

मुंबईतील जखमी झालेल्या ३१ गोविंदावर विविध रुग्णालयातील ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत.काल पावसाने दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचला होता.चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या बक्षिसांच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी नऊ थर रचण्यात आले.

मुंबईतील जखमी गोविंदांपैकी केईएम रुग्णालय- २३,पोद्दार हॉस्पिटल – ६, राजावाडी रुग्णालय – २, शताब्दी रुग्णालय – १,वांद्रे भाभा रुग्णालय -१,कूपर हॉस्पिटल – २ आणि बीडीबीए रुग्णालयात १ जण उपचार घेत आहे. ठाण्यात ११ जखमी गोविंदावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले.तर,सहा जखमी गोविंदावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

‘यंदाच्या दहीहंडीत लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता, तसेच अनेक ठिकाणी बालगोविंदांना सेफ्टी बेल्ट लावण्याची व्यवस्था नव्हती. ९ ते १४ वर्षांच्या मुलांचा वापर केलेला दिसून येत होता. अनेक ठिकाणी नियम पायदळी तुडवले होते,’ अशी माहिती कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top