मुंबई ठाणे रायगडात उद्या जोरदार पाऊस

मुंबई- मुंबई आणि परिसरातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरडे असलेले वातावरण बदलण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. मुंबई जवळच्या ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात उद्या जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
मुंबईला कोणताही अलर्ट दिला नसला तरी मुंबईत उद्या आणि परवा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमधून अधिकृतरित्या मोसमी पाऊस संपण्याची तारीख १० ऑक्टोबर अशी देण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यात मुंबईत पाऊस पडला नव्हता. सप्टेंबर महिन्यात केवळ १७३ मिलीमीटर पावसाचीच नोंद झाली आहे. मुंबईच्या सप्टेंबर महिन्याच्या सरासरीच्या केवळ ५० टक्केच पाऊस पडल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबई जवळच्या जिल्हयांमध्ये मात्र उद्या व परवा असे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ढगांच्या कडकडाटासह वीजा चमकण्याचाही इशारा देण्यात आला आहे. या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील. शनिवारपासून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आले असून ते वरच्या पट्ट्यात सरकत आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता मुंबईच्या हवामान विभागाने सांगितली आहे. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top