रायगड- मुंबई – गोवा महामार्गावरील कोलाड ते माणगाव, इंदापूरदरम्यान २३ किलोमीटरच्या अंतरावर खड्ड्यांमुळे आज सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे गावी गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
गावी जाण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आज सकाळपासून मुंबई- गोवा महामार्गावरुन टु व्हीलर, रिक्षा, चारचाकी, एसटी, खासगी बसने निघाले. त्यामुळे कोलाड, इंदापूर ते माणगाव या २३ किलोमीटरच्या अंतरावर लांबच लांब रांगा लागल्या. त्यात कोलाड, इंदापूर, माणगाव बाजारपेठेतील रस्ता एकेरी असल्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूककोंडीचा मंत्री उदय सामंत यांनाही फटका बसला. तेही वाहतूक कोंडीत अडकले होते. मात्र त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना उदय सामंत म्हणाले की, आम्ही कोणत्याही वाहतूक कोंडीत अडकलो नाही. आमच्या विरोधात फेक नेरेटीव पसरवला जात आहे.