डोंबिवली – रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची जवाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हाती द्यावे अशी मागणी शिंदे सेनेकडून केली आहे. शिंदेसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ भोईर, पदाधिकारी संतोष चव्हाण, विवेक खामकर आणि रमाकांत देवळेकर यांनी ही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही केली आहे. या मागणीचे एक निवेदन पदाधिकाऱ्यांनी खासदार शिंदे यांना डोंबिवली शहर शाखेत दिले आहे. श्रीकांत शिंदे यांनी खासदार पदाच्या तीन टर्ममध्ये कल्याण लोकसभा मतदार संघातील गेम चेंजर प्रकल्प मार्गी लावले आहेत. काही प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे एक वेगळा पर्याय म्हणून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम खासदार शिंदे यांनी हाती घ्यावे अशी मागणी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षापासून रखडले आहे. हे काम रखडल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली होती. त्यानंतर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कंबर कसली आहे. महामार्गाच्या कामाची प्रत्येक महिन्याला जाऊन ते पाहणी करत आहेत. अशातच आता शिंदे गटाकडून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई-गोवा महामार्गाची जबाबदारी खासदार शिंदे यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे.