मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर कंटेनर जळून खाक

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीरपासून सुमारे दीड किलोमीटरवर शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रॅकवर आयशर कंटेनर एमएच १८, बीए ०११६ जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात ट्रकसह २८ ते ३० लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकाने वेळीच उडी घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वायर बॉक्समधील शॉर्टसर्किटमुळे कंटेनरने पेट घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, त्याच मार्गाने जाणाऱ्या अन्य वाहनांनी कंटेनरमध्ये असलेली सौंदर्यप्रसाधने व शालेय साहित्य उचलून पोबारा केला. तर एक चालकाचा असा प्रयत्न उपस्थितांनी हाणून पाडत चांगलाच चोप दिला. इंदूरचे अब्दुल घौरी यांचा मालकीचा हा कंटेनर होता. भिवंडीहून सौंदर्यप्रसाधने, साबण, शालेय साहित्य, गणवेश, चपला आदी भरून चालक साजिद खान सोमवारी सायंकाळी इंदूरकडे जाण्यासाठी निघाला. सोनगीर ओलांडून वाघाडी फाट्याजवळ वाहनातून धुराचा वास आल्याने व तो बॉक्समधून निघत असल्याचे दिसून आले. त्यामुळे चालकाने वाहन थांबवून उडी घेतली. थोड्याच वेळात कंटेनरच्या केबिनने पेट घेतला. आगीच्या लोळामुळे त्या ट्रॅकवरील वाहने थांबली. तिथे असलेल्या एका हॉटेलचे मालक अर्जुन मराठे, बागुल यांनी टँकरने पाणी आणून आग आटोक्यात आणली. कंटेनरमधील आग विझविण्यात यश आले.

Scroll to Top