मुंबई – मुंबईसह राज्यभरात कालप्रमाणे आजही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका उपनगरीय रेल्वेलाही बसला असून मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिरा सुरु होती. मुंबईजवळच्या समुद्रालाही उधाण आले होते. कोकणासह राज्याच्या सर्वच भागात पाऊस होत असून १ जून ते १८ जुलै या कालावधीतील सरासरी पावसापेक्षा यंदा जास्त पाऊस झाला आहे.
मुंबईत नरिमन पॉईंट, कुलाबा या भागात जोरदार पाऊस पडला, तर उपनगरात झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. कोकणात रत्नागिरीत काल पासून मुसळधार पाऊस झाला. खेडमधील जगबुडी आणि राजापूरची कोदवली या नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. पावसाने कणकवली-आजरा मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावरही धोकादायक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडस उभारण्यात आले आहेत. सावंतवाडीतील सखल भागातही पाणी साचले.
उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस झाला. नाशिक, जळगाव, धुळे या बरोबरच नंदूरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वैजाली आणि नांदर्डै गावांना जोडणार्या वाकी नदीवरील छोटा पूल पुरात वाहून गेला. दोन वर्षांपूर्वीच हा पूल कमकुवत झाला होता. त्यानंतरही दुरुस्तीचे काम न केल्याने तो काल वाहून गेला. यामुळे नांदर्डे, करणखेडा या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. नांदर्डे व करणखेडा गावातील ग्रामस्थ व शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोंनवल , वैजाली मार्गे प्रवास करावा लागत आहे.
विदर्भातही पावसाचा जोर असून अकोला, अमरावती, यवतमाळ या भागातही जोरदार पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचले. वर्धा नदीचा प्रवाह ही वाढला असून नागपूर, अमरावती व यवतमाळ रस्त्यावरील अनेक ओढ्यांना पूर आल्याने काही मार्ग बदलण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्यात आली, तर गडचिरोलीत २७० मिली पावसाची नोंद झाली. गडचिरोली शहरात व इतर भागातील सखल भागात पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. गडचिरोलीच्या ग्रामीण भागात रस्ता वाहून गेला. या रस्त्याचे काम सुरू असताना एक गर्भवती महिला रुग्णालयात जाण्यासाठी आली असता तिला जेसीबीच्या बकेटच्या सहाय्याने रस्त्याच्या दूसऱ्या बाजूला पोहोचवले. गडचिरोलीला रेड अलर्ट देण्यात आला असून तीन राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. नद काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा, गोंदियातही जोरदार पाऊस सुरु असून चंद्रपूरातील अनेक नद्यांना पूर आले.