मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्ण भरले. ज्यानंतर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ७०६.३० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी पूर्ण भरून वाहणारे हे पाचवे धरण आहे.
मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयदेखील पूर्ण भरला. मध्य वैतरणा जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर इतकी आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतकी आहे. शनिवारी या ७ धरणांमध्ये ८९.१० टक्के इतका जलसाठा होता. मुंबई महापालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे करण्यात आले आहे.