मुंबई – मुंबई शहर आणि उपनगरात मिळून १०, ४४७ ब्रिटिशकालीन फायर हायड्रंट म्हणजेच नळखांब होते.यापैकी साडेनऊ हजार नळखांब सध्या बंद आहेत. हे नळखांब जमिनीत गाडल्या गेलेल्या अवस्थेत आहेत.अशाप्रकारे केवळ १५ टक्के नळखांब शिल्लक आहेत.
मुंबईतील दाटीवाटीच्या नागरी वस्तीत आग विझवण्यासाठी तयार करण्यात आलेली ही ब्रिटिशकालीन यंत्रणा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. या नळखांबांचा गैरवापर होत असल्याने ते पुनरुज्जीवित केले जात नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये चिंचोळ्या गल्ल्या आहे. या ठिकाणी सर्वसामान्य मुंबईकर दाटीवाटीच्या वस्तीत राहतात. या ठिकाणी आगीची घटना घडल्यास आयत्यावेळी आग विझविण्यासाठी जमिनीखालील पाण्याचा वापर करून नळखांबाद्वारे आग विझवली जायची. मात्र, काळानुसार मुंबईचा विकास झपाट्याने होत गेला आणि हे नळखांब जमिनीखाली गाडले गेले.
शहरात ठिकठिकाणी असलेले ब्रिटिशकालीन नळखांब पुनरुज्जीवित करावेत अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. त्यानंतर महापालिकेने काही भागातील नळखांब पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, या नळखांबांचा गैरवापर होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. कित्येकदा बांधकामासाठी अथवा टँकर भरण्यासाठी हे नळखांब वापरले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेने ते सुरू ठेवण्याबाबत अथवा त्यांचे पुनरुज्जीवन करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे, अशी माहिती पालिकेचे उपजल अभियंता मंगेश शेवाळे यांनी दिली.