मुंबई- मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी दुसर्यांदा निविदा प्रक्रिया राबविली होती.त्यामध्ये एका कंत्राटदाराने १६०० कोटींच्या कंत्राटासाठी चक्क ९ टक्के अधिक दराने निविदा भरली आहे.मात्र या कंत्राटात हातमिळवणी झाल्याचा संशय मुंबईकरांच्या मनात येऊ शकते.त्यामुळे एकालाच कंत्राट देण्याऐवजी प्रभागनिहाय कंत्राट देण्यात यावे,अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात शहर आणि उपनगरात सिमेंट
काँक्रिटच्या रस्ते कंत्राटासाठी ६००० हजार कोटींची निविदा प्रक्रिया राबविली होती.त्यामध्ये दक्षिण मुंबईत मे.रोडवेज सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला कंत्राट मिळाले होते.पण या कंपनीने वेळेत काम सुरू केले नाही.त्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करून दुसरी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.त्यामध्ये एका कंत्राटदाराने १६०० कोटींच्या कंत्राटासाठी ९ टक्के जादा म्हणजे १५० कोटी अधिक देण्याची तयारी दर्शविली आहे.विशेष म्हणजे सिमेंट काँक्रिटच्या अन्य रस्त्यांसाठी त्याच रकमेला कंत्राटे दिली आहेत. त्यामध्ये कोणालाही अधिक दराने कोणतेही कंत्राट दिलेले नाही.त्यामुळे दक्षिण मुंबईतील रस्ते कंत्राटही त्याच धर्तीवर दिले जावे,असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.