मुंबई- मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतून मुंबईला पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाईपलाईन फुटणे, पाईपलाईन गळणे, पाणी चोरी या घटना पाहता मनपाने थेट जमिनीखाली जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेतला. मुंबई शहरात विविध ठिकाणी जलबोगद्यांचे जाळे तयार केले जात आहे.
याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील येवई जलाशय येथून मुलुंडपर्यंत तब्बल २१ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधला जाणार आहे. हा बोगदा ६ ते ७ वर्षांच्या कालावधीत पूर्ण केला जाईल. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी ५५०० कोटी रुपयांची विक्रमी तरतूद सुद्धा केली आहे. पहिल्या टप्प्यात येवई जलाशय ते भिवंडीतील कशेळी असा १४ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधणार, तर दुसऱ्या टप्प्यात कशेळी ते मुलुंड या दरम्यान ७ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्याचे नियोजन आहे. या जलबोगद्याच्या प्रकल्पाबाबत नागरिकांना व इतर संस्थांना काही आक्षेप असेल तर त्यांनी महिन्याभरात आक्षेप नोंदवावा असे आवाहन पालिकेने केले आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून जलबोगद्याचे काम सुरु होईल.