मुंबई – मलबार हिल येथील १३५ वर्षांच्या ब्रिटिशकालीन जलाशयाचे आयुर्मान संपल्याने हा जलाशय मुंबई महापालिका पुन्हा नव्याने बांधणार आहे. त्यासाठी अंदाजे ६०० कोटी रूपये खर्च होणार असल्याची माहिती पालिकेच्या जल विभागातील अधिकार्यांनी दिली.
या नव्याने बांधल्या जाणार्या जलाशयाचे काम पाच टप्प्यांत आणि पाच वर्षांत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील नवीन पंपिंग स्टेशन आणि सब स्टेशनचे बांधकामही सुरू झाले आहे. या नवीन जलाशयातून कुलाबा,फोर्ट, कफ परेड,नरिमन पॉइंट, चर्चगेट,सँडहर्स्ट रोड, काळंबादेवी,मलबार हिल, नेपियन्सी रोड, आणि ग्रँट रोडमधील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. हा जलाशय १८८७ बांधण्यात आला होता. त्यांचीच पालिका आता पुनर्बांधणी करणार आहे. या जलाशयाची सध्याची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता वाढवून १९० दशलक्ष लिटर केली जाणार आहे. या जलाशयाच्या पुनर्बांधणीचा एकूण खर्च अंदाजे ६०० कोटी इतका आहे.पालिकेने गेल्यावर्षीच यासंदर्भात निर्णय घेतला होता.
दरम्यान, या जलाशयाच्या पुनर्बांधणी काळात या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिमाण होऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात याच भागात बाजूला २३ दशलक्ष लिटर पाणी क्षमतेचे नवीन जलाशय आणि १४ दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली जाणार आहे.