मुंबई – एलिफंटा गुंफा पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणार्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने नीलकमल बोट समुद्रात उलटली आणि बोटीतील प्रवासी समुद्रात पडले. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 नौदल कर्मचार्यांचा समावेश आहे. तर 101 जणांना वाचविण्यात यश आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर सुदैवाने नौदलाच्या बोटी, हेलिकॉप्टर आणि मच्छीमार बोटींनी वेगाने बचावकार्य केल्याने बोटीतून समुद्रात पडलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. मृतांच्या कुटुंबियांना सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर पोलीस आणि नौदल या दुर्घटनेची चौकशी करणार आहेत.
नीलकमल ही 130 प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता असलेली बोट आज प्रवाशांना घेऊन दुपारी 3.15 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा गुंफेकडे निघाली होती. वाटेत उरण, कारंजा परिसरात नौदलाची एक स्पीड बोट वेगाने आली. या बोटीने नीलकमलला चक्कर मारली आणि ती बोट दूर जाऊन पुन्हा प्रचंड वेगाने नीलकमलच्या दिशेने येत नीलकमलवर धडकली आणि मोठी दुर्घटना घडली. या आघाताने नीलकमल बोटीचे दोन तुकडे झाले आणि बोट उलटली. बोटीतील प्रवासी समुद्रात पडले. त्यानंतर वेगाने बचावकार्य झाल्याने 101 जणांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, या दुर्घटनेबाबत सायंकाळी माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या अपघातात व्हाईस अॅडमिरल संजय जगजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाची एक स्पीड बोट त्यात बसवलेल्या नव्या इंजिनची चाचणी घेण्यासाठी समुद्रात फेरी मारत होती. पण त्याचवेळी इंजिनात बिघाड झाल्याने स्पीड बोट चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती बोट नीलकमलवर आदळली. या अपघातात 10 प्रवाशी आणि नौदलाचे कर्मचारी मिळून 13 जणांचा मृत्यू झाला. तर 101 प्रवाशांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. यातील बचावलेल्या 56 प्रवाशांना जेएनपीटी तर 9 जणांना डॉकयार्ड, 9 जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या अपघाताची सविस्तर माहिती उद्यापर्यंत मिळू शकेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, नीलकमलचे मालक राजेेंद्र परते यांनी सांगितले की, ही प्रवासी बोट होती. ही बोट रोजच एलिफंटाला जात होती. बोटीत लाईफ जॅकेट होते. सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात आले होते. मात्र नेव्हीची स्पीड बोट जोरात धडकल्याने हा अपघात झाला. नौदलाच्या बोटीवर असलेल्या चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत सरकारने
जाहीर केली आहे.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या दुर्घटनेची प्राथमिक माहिती दिली. या बोटीतील प्रवाशांना आणि मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक मदत ताबडतोब द्यावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली. घटनास्थळी शेकाप नेते जयंत पाटील पोहोचले होते. पत्रकार आणि छायाचित्रकारांचे गेटवे ऑफ इंडिया येथे प्रचंड गर्दी झाली होती. बचावलेल्या प्रवाशांना दुसर्या बोटीने सायंकाळपर्यंत गेटवे ऑफ इंडिया किनार्यापर्यंत
आणण्यात आले.
स्पीड बोटीने जेव्हा प्रवासी बोटीला धडक दिली तेव्हा त्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने शूट केला. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेटवे ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुंफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. आज प्रथमच असा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक मच्छीमार व चार हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू केले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलीस पथकाच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या. बचावकार्य उशिरापर्यंत सुरू होते. बचावकार्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला
दिले आहेत.