मुंबई – परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त किंवा निवृत्तीनंतर आपल्या मुलांकडे राहणाऱ्यांनाही राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. मात्र त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदानाचा तो बजावावा लागणार आहे. यावेळी परदेशात राहणार्या मुंबईकर मतदारांची संख्या २ हजारांहून अधिक आहे. मुंबई शहरात अशा मतदारांची संख्या ४०७, तर उपनगरात १,८८१ एवढी आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेक अनिवासी भारतीय फक्त मतदानासाठी मुंबईत आले होते. मात्र, मतदारयादीत नाव नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीपासून दक्षता घेतली आहे. परदेशात असलेल्या मतदारांनी यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी आणि मगच मतदानासाठी यावे, असे आवाहन निवडणूक आयोग प्रशासनाने यापूर्वीच केले आहे. दोन हजारांहून अधिक अनिवासी भारतीय मुंबईकर मतदार आहेत. त्यांचे नाव मतदारयादीत असल्याने त्यांना पासपोर्टच्या पुराव्याआधारे मतदान करता येईल. अनिवासी भारतीयांना ओळख पटविण्यासाठी त्यांचा पासपोर्ट आवश्यक आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.