मुंबईतील आयकॉनिक इरॉस थिएटर जमीनदोस्त होणार? सत्य की अफवा

मुंबई – चित्रपटसृष्टी आणि मुंबई शहर यांचे अनोखे नाते सर्वांनाच माहीत आहे.अनेक चित्रपट नायकांना मोठे करण्यात मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर्सचा सिंहाचा वाटा आहे.पण अशाच मुंबईतील चर्चगेट परिसरातील इरॉस थिएटरबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.हे आयकॉनिक थिएटर पाडले जाणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.पण ही माहिती खरी की अफवा हे स्पष्ट झालेले नाही. एकतर येथे मॉल बांधला जाणार आहे तर असेही कळते की या थिएटरचे नूतनीकरण केले जात आहे.
सोशल मीडियावर पसरलेल्या या माहितीनुसार २०१८ च्या ‘वर्ल्ड हेरिटेज साइट्स’च्या यादीत समाविष्ट झालेले इरॉस थिएटर पाडले जाणार आहे.तसेच त्या जागेवर मॉल बांधला जाणार आहे.ही बातमी समोर येताच काही बॉलिवूड कलाकार आणि लोकांनी याबद्दल सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे.‘इरॉस सिनेमा’चे काही जुने फोटोज बॉलीवूडचे पटकथा लेखक-संपादक अपूर्व असरानी यांनी शेअर करताना लिहिले, “हे खूप हृदयद्रावक आहे. हे दक्षिण बॉम्बे आर्ट डेको लँडमार्क, १९३८ मध्ये बांधले गेले होते, जिथे मी कॉलेजला दांडी मारून चित्रपट पाहिले, माझी पहिली डेटही इथेच होती, इथेच माझा पहिला चित्रपट ‘सत्या’ १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता.मुंबईला आपल्या हेरिटेज वास्तू जतन करता येत नाहीत याचा खेद वाटतो.” त्यापाठोपाठ अभिनेता आणि कॉमेडीयन वीर दास आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीदेखील त्यांची पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान,यासंदर्भात अशीही माहिती सांगितली जात आहे की,इरॉस पाडणार असल्याची माहिती ही निव्वळ अफवा आहे.तिथे मॉल उभारला जाणार नाही. तर या थिएटरचे नूतनीकरण केले जात आहे.त्यामुळेच त्याला झाकण्यासाठी सुरक्षा म्हणून जाळ्या लावल्या आहेत आणि हेच फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत.वास्तविक इरॉस थिएटर हे २०१७ मध्येही बंद करण्यात आले होते. यापूर्वी चंदन सिनेमा, इंपीरियल सिनेमा, रॉयल सिनेमा, नोवेल्टी सिनेमा अशी बरीच चित्रपटगृह बंद करण्यात आलेली आहेत.पण ‘इरॉस’ पाडण्याबद्दल अजूनही बऱ्याच ठिकाणी संभ्रम बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर पसरवली जाणारी ही अफवा आहे आणि तिथे केवळ नूतनीकरणाचे काम सुरू आहे असेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top