मुंबईच्या हवेत सुधारणा नाही बांधकामांमुळे धुके कायम

मुंबई

दिवाळीत मुंबईतील हवेची गुणवत्ता प्रचंड घसरल्याचे निरीक्षण सफर या संस्थेने नोंदवले होते. बीकेसी, मालाड, कुलाब्यासह वरळीची हवा खराब नोंदवली गेली. दिवाळीनंतर हवेत सुधारणा होण्याची अपेक्षा होती. परंतु अद्यापी मुंबईच्या हवेत सुधारणा झाली नसल्याचेच निरीक्षण सफरने नोंदवले आहे. वरळी, नवी मुंबई, माझगाव येथील हवा समाधानकारक असल्याचे निरीक्षण सफरने काल नोंदवले. मात्र, विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे मुंबईत धुरके कायम आहे.

महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘महापालिका दररोज सुमारे २४० किमी रस्ते धुत आहे. यासाठी ५२ टँकर आणि मशीनचा वापर केला जात आहे. १ डिसेंबरपर्यंत शहरातील १००० किमी रस्ते धुण्याचे लक्ष्य आहे. आम्ही वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, एसव्ही रोड, लिंकिंग रोड आणि एलबीएस रोडसारखे मुख्य रस्ते धुण्याचा प्रयत्न करत आहोत.’ माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले, ‘यंदा पावसाळा सुरू होण्याआधीच पाण्याचा साठा कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रस्ते धुण्यासाठी पाण्याचा वापर सुरू राहिला, तर पुढच्या वर्षी अशीच दुष्काळग्रस्त परिस्थिती उद्भवू शकते. याऐवजी महापालिकेने प्रदूषण करणारे उद्योग, आरएमसी प्लांट आणि बांधकाम साईटवर नियंत्रण ठेवले पाहिजे.’
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे म्हणाले की, ‘मुंबईतील एक्यूआय सातत्याने मध्यम श्रेणीत आहे. वायू प्रदूषण मार्गदर्शक तत्त्वे न पाळणाऱ्यांविरुद्ध महापालिका कठोर कारवाई करत आहे. यामुळे वायू प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. सध्या आम्ही मुंबईसाठी स्मॉग टॉवर बसविण्याचा विचार करत नाही.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top