मुंबई – बृहन्मुंबई महानगर पालिकेने सागरी महामार्ग टप्पा २ च्या बांधकामासाठी एका प्रकल्प सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या सल्लागार कंपनीला या कामासाठी ५५९ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.सागरी महामार्ग टप्पा २ हा १८.४७ किलोमीटरचा असून त्याद्वारे वर्सोवा ते दहिसर ही दोन उपनगरे जोडली जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून गोरेगाव ते मालाड दरम्यानच्या ४.४६ किलोमीटर लिंकरोडचीही बांधणी होणार आहे. दहिसर ते भाईंदर ही उपनगरेही या मार्गाने जोडली जाणार आहेत.वर्सोवा दहिसर लिंक रोड प्रकल्पातील महामार्गची उभारणी जमिनीपासून उंचावर असून मार्गात केबल पुलही असेल. मालाड ते कांदिवली हा प्रचंड गर्दीचा व दाटीवाटीचा मार्ग जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे. गोरेगाव ते मुलुंडचा भाग जोडण्यात येणार असून त्याद्वारे पश्चिम व पूर्व महामार्गही जोडले जातील. यासाठी गोरेगावच्या फिल्मसिटीपासून ते मुलुंडच्या खिंडीपाड्यापर्यंत १.६५ किलोमीटर बॉक्स टनेल बांधण्यात येणार आहे. यामध्ये ६ लेनचा रस्ता बांधण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे काम ६ वेगवेगळ्या टप्प्यात केले जाणार आहे. प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नियुक्ती केली जाईल. सागरी किनारी महामार्ग टप्पा २ साठी १६ हजार ६२२ कोटी रुपये खर्च येणार असून हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होईल. पर्यावरणाशी संबंधित अनेक विभागांची मंजूरी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. या मार्गादरम्याच्या भागातील जलपर्णीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. या कामासाठी नेमेलेली प्रकल्प सल्लागार समिती या प्रकल्पाची योजना, रेखाटने, परवानग्या व इतर सर्व बाबींसाठी आपली सेवा देणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते भाईंदर पर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे.
मुंबईच्या सागरी महामार्ग साठी सल्लागार संस्थेला ५५९ कोटी
