मुंबईच्या तापमानात अंशत: घट
राज्यात काही भागात पावसाची शक्यता

मुंबई – मुंबईसह आजबाजूच्या परिसरातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढ असताना मुंबईच्या तापमानात घट झाल्याने मुंबईकारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईचे तापमान 35.6 अंशांवर पोहोचले होते. तर काल मुंबईतील तापमान 39.4 अंश नोंदवण्यात आले. हे तापमान या हंगामातील मुंबईचे सर्वाधिक होते. पुण्याचे 33.8, नाशिकेचे 33.4, अमरावती 37.6 आणि नागपूर 35.2 अंश तापमान राहिले.
दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश पासून उत्तर प्रदेशपर्यंत त्या पातळीतून जाणाऱ्या हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेच्या संयोग आणि उर्ध्वगामितेमुळे इतर राज्यांबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. 16 मार्चपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, 14 ते 16 मार्च पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, 15 ते 17 मार्चदरम्यान तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

कोल्हापुरात आज-उद्या अवकाळी पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. तापमानातही घट होणार असून कमाल तापमान 32 अंश सेल्सियसपर्यंत खाली येणार आहे. पावसाळी हवामानामुळे या आठवड्यात कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.

Scroll to Top