मुंबई- मागील चार दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.काही जलाशय ओसंडून वाहत आहेत.या परिस्थितीत यंदा मुंबईकरांची पाणीकपात टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई शहराला अप्पर वैतरणा,मोडक सागर, तानसा,मध्य वैतरणा, भातसा,विहार,आणि तुळशी या सात जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो.या सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून या तलावांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पालिकेच्या माहितीनुसार, यामध्ये १४ लाख ३५ हजार ५२४ दशलक्ष लिटर म्हणजेच ९९.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ९९.२७ टक्के इतका नोंदवण्यात आला होता.मंगळवारपासून सुरू झालेल्या या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात खालावलेली जलाशयांची पातळी भरून निघाली आहे.त्यामुळे मुंबईला पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.