अमरावती- अमरावतीत आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके आणि देवेंद्र भुयार निधिवाटपावरून आक्रमक झाले. वारंवार माझा अपमान होत आहे. मी आमदार आहे, चपराशी नाही, असे म्हणत यशोमती ठाकूर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर भडकल्या.
चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. निधिवाटपात भेदभाव केला जात आहे. आमच्या मतदारसंघात सरकारकडून कमी निधी मिळत आहे. आमदार म्हणून आमचा अधिकार आहे. तो हिरावून घेऊन शकत नाही. सरकारकडून वारंवार माझा अपमान होत आहे. मी आमदार आहे, न की चपराशी आहे.
याच बैठकीत अमरावतीच्या अचलपूरमधील फिनले मिलवरून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात खंडाजगी झाल्यामुळे गोंधळ उडाला. बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघातील फिनले मिल गेल्या कित्येक वर्षांपासून बंद होती. ती सुरू करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली. त्यासाठी रवी राणा यांनी या बैठकीत चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. तेव्हा बच्चू कडू यांनी सांगितले की, सहा महिन्यांआधीच फिनले मिल सुरु करण्याबाबत मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर मात्र राणा आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली. रवी राणा आपले आसन सोडून बच्चू कडू यांच्याकडे आले. केंद्र सरकारच्या अख्यत्यारित फिनले मिल येते. नवनीत राणा त्यावेळी कधी बोलल्या नाही, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. माझ्यावर खापर फोडून मला बदनाम करण्याचा रवी राणा यांचा प्रयत्न असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. तर 4 वर्षांपासून फिनले मिल बंद आहे, लोकांना मूर्खात काढू नका,असा पलटवार रवी राणा यांनी केला.