भाईंदर- मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ मीरारोडच्या काशिमीरा परिसरातील मीरागाव भागात जलतरण तलाव उभारला जाणार आहे.त्यासाठी जवळपास ९९ झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यातील ९३ झाडे तर मुळासकट तोडली जाणार आहेत.तर केवळ ६ झाडांचे पुनरोपण केले जाणार आहे. मीरा- भाईंदर पालिकेच्या या निर्णयावर पर्यावरणप्रेमींनी मात्र संताप व्यक्त केला आहे.
मीरागाव भागात इकोसिटी बांधकाम प्रकल्पाच्या बाजूला व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच असलेल्या इको सेन्सिटीव्ह झोन परिसरात जलतरण तलाव उभारला जाणार आहे.मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाने त्याला एका ठरावाद्वारे मंजुरी दिली आहे.या जलतरण तलावासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेली अनेक जुनी आणि मोठमोठी झाडे तोडली जाणार आहेत.वास्तविक,ही जागा महापालिकेच्या आरक्षण क्रमांक ३६८ मध्ये उद्यानासाठी राखीव आहे. तरीही तिथे उद्यानाऐवजी जलतरण तलाव उभारला जाणार आहे.त्यासाठी ही झाडांची कत्तल केली जाणार आहे.या योजनेसाठी शासनाच्या मूलभूत सोयी-सुविधा विकास अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे या जागेचे सर्वेक्षण करून प्रशासनाने पुढील प्रक्रिया हाती घेतली आहे.