भाईंदर – मिरा -भाईंदर शहरात गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेले न्यायालय इमारतीचे काम आता पूर्ण झाले आहे. ही इमारत काही दिवसांत न्याय विधी विभागाकडे देण्यात येणार आहे.त्यानंतर पाठपुरावा करून दोन महिन्यात कामे पूर्ण करण्यात येणार असून न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायालयासाठी लागणारे कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करून जानेवारीमध्ये म्हणजे येत्या नव्या वर्षात प्रत्यक्षात न्यायालयाचे दरवाजे नागरिकांसाठी उघडले जातील,अशी माहिती स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मिरा -भाईंदर शहरातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी ठाणे येथे जावे लागत होते.त्यामुळे शहरातील नागरिकांनी मिरा -भाईंदरमध्ये न्यायालय सुरू करण्याची मागणी केली होती.त्यानुसार येथे न्यायालयीन इमारत व न्यायिक अधिकार्यांचे निवासस्थान बांधकाम मौजे घोडबंदर सर्वे क्र.२३३ या जागेत क्षेत्रफळ ४३५३.३७ चौरस मीटर या जागेत २०१४ पासून सुरू करण्यात आले आहे. न्यायालयाच्या बांधकाम सुरू झाल्यानंतर निधी अभावी काम काही वर्षे बंद होते. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे काम सुरू आहे. आता काम पूर्ण झाले आहे. महापालिकेकडून बांधकामाचा भोगवटा दाखल,अग्निशमन ना हरकत दाखला, वृक्षप्राधिकरण विभागाची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
मिरा -भाईंदरच्या न्यायालयाचे दरवाजे नव्या वर्षात उघडणार !
