ठाणे- मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य माळशेज घाटातील धबधब्याखाली मौजमजा करण्यासाठी पर्यटक नेहमी येतात, परंतु मुसळधार पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडून काही अपघात होऊ नये; यासाठी ठाणे जिल्हाधिकार्यांनी मनाई आदेश काढला आहे. तरीही पर्यटक या आदेशाकडे दुर्लक्ष करून माळशेज घाटात गर्दी करत आहेत.
पावसाळा सुरू झाला की, मुंबई,ठाणे, पुणे, कल्याण, रायगड जिल्ह्यातील हजारो पर्यटक माळशेज घाटावर गर्दी करतात. परंतु माळशेज घाटातील दगड ठिसूळ झाल्याने अनेकवेळा दरडी कोसळतात. त्यामुळे दुर्घटना घडून जीवितहानीही होती. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश काढून या ठिकाणी पर्यटकांना धबधब्याखाली जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरीसुध्दा अनेक पर्यटक या आदेशाकडे दुर्लक्ष करत धबधब्याखाली मनमुराद भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी जात असतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.