मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी ३ डिसेंबर रोजी सुनावणी निश्चित केली. दरम्यान सरकारने जयदीप विरोधात कनिष्ठ न्यायालयात सादर केलेल्या २ हजार पानांच्या आरोपपत्राची प्रत उच्च न्यायालयात सादर केली.
मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीचे निकृष्ट काम उघड झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटेला ४ सप्टेंबर रोजी कल्याणमधून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून आपटे याने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. गणेश सोवनी यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने अर्जाची सुनावणी ३ डिसेंबर रोजी निश्चित केली आहे.