सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा आज कोसळला. भारतीय नौदल दिनानिमित्त गेल्याच वर्षी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. त्याला आठ महिनेही झाले नाहीत तोच हा पुतळा पूर्णपणे कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारलाच कसा, असा सवाल त्यांनी केला आहे. या पुतळ्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही होत आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचारी नेते-कंत्राटदारांनी सोडले नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आज या निमित्ताने उघड झाली. पंतप्रधान मोदी येणार म्हणून घाईने या पुतळ्याच्या अनावरणाचा सोहळा घेतला, अशीही टीका होत आहे.
मालवण राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे निकृष्ट काम केल्याचा आरोप शिवप्रेमींकडून आधीपासून करण्यात येत होता. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पाऊस-वाऱ्याचा मारा हा पुतळा सहन करू शकला नाही. आज दुपारी पुतळा पूर्णपणे कोसळला. ही बातमी पसरताच शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली. उबाठाचे स्थानिक आमदार वैभव नाईक लगेच आपल्या काही कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, शिवाजी महाराजांचा हा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळला. याचे आम्हाला दु:ख होत असून, एक शिवप्रेमी म्हणून मी याचा निषेध करतो. 8 महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. ज्यावेळी काम सुरू होते, त्यावेळीही स्थानिक लोकांनीसुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. 400 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण हा पुतळा कोसळला. या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा झाला पाहिजे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल.
ही प्रतिक्रिया दिल्यानंतर काही वेळातच आ. वैभव नाईक आक्रमक झाले. त्यांनी मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. त्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या. खा. छत्रपती संभाजीराजे सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभरात कोसळतो यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्षेत परत काही गडबड करू नये. उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.
खा. सुप्रिया सुळे ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल ही जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. एक वर्षही पूर्ण होण्याआधी हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेचीदेखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले, यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. शरद पवार गटाने थेट पंतप्रधानांवर निशाणा साधत म्हटले की, पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला. राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला. प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाच फटका बसला आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आणि मते घेतली. पण सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा कोसळला. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्राची जनता कदापी माफ करणार नाही. या घटनेवरून संताप व्यक्त झाल्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या पुतळ्याच्या बांधणीचे काम नौदलाने केले होते. संपूर्ण डिझाईन नौदलाचे होते. मी जिल्हाधिकार्यांशी बोललो. त्यांनी सांगितले की, त्यावेळी 45 किमी वेगाने वारे वाहात होते. त्यात पुतळ्याचे नुकसान झाले. नौदलाचे अधिकारी उद्या तिथे जाणार आहेत. मंत्री रवींद्र चव्हाणही तिथे गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभारण्याचे काम आम्ही करू.
दरम्यान, हा पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या दळवी आणि आपटे या अधिकाऱ्यांवर स्ट्युु मोटो गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पोलिसांना दिले.
सुशोभीकरणावर 5 कोटींचा खर्च
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सुमारे 43 फूट उंच होता. जमिनीपासून बांधकाम 15 फूट उंच चबुतरा आणि त्यावर 28 फूट उंच पुतळा असे त्याचे स्वरूप होते. शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. राज्य सरकार आणि नौदल विभागाने पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींना उद्घाटन करता यावे, यासाठी पुतळा उभारण्याचे काम जलदगतीने पूर्ण केले होते.
मालवण किल्ल्यावरील 28 फूट उंच पूर्णाकृती! शिवाजी महाराजांचा पुतळा 9 महिन्यांत कोसळला
