मालवणी रामनवमीच्या शोभायात्रा राडाप्रकरणी आरोपींना ६ एप्रिलपर्यंत कोठडी

मुंबई :- देशभरात काल रामनवमी उत्साहात साजरी झाली असली तरी अनेक राज्यांमध्ये या धार्मिक उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट लागले. मुंबईतही मालाड मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत दगडफेकीचा प्रकार घडल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. दगडफेक आणि लाठीचार्ज या दोन्ही घटनांमध्ये सुमारे १५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी २० जणांना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ६ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

रामनवमी निमित्ताने मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात बजरंग दलाकडून शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते.याच शोभायात्रेत मालवणी गेट क्रमांक पाच जवळ दोन गटांकडून ढोल आणि स्पिकर लावण्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.

या घटनेनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस ठाण्याला घेराव घालून धरणे आंदोलन सुरू केले.यावेळी भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी म्हटले की, ही खेदजनक बाब आहे की राज्यात शिवशाहीचे सरकार असतानाही रामनवमीच्या शोभायात्रेत चप्पल फेक आणि दगडफेक करण्यात आली.नमाज सुरू असताना ढोल वाजविला जात असल्याने त्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावेळी सुरुवातीला ढोल बंद केला पण नंतर ढोल वाजविण्यास सुरुवात झाल्यानंतर दगडफेक झाल्याची माहिती तिवाना यांनी दिली.यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी केली.सध्या मालवणी परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Scroll to Top