पिंपरी – महापालिकेचा मालमत्ता कर हा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असून शहरात 5 लाख 97 हजार 785 मालमत्ता आहेत. शहर वाढत असताना मालमत्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अनेक जण मालमत्तांची महापालिकेच्या दप्तरी नोंद करत नसल्याचे वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यापूर्वी महापालिकेने 2013 मध्ये सर्वेक्षण केले असता यामध्ये सुमारे 35 हजार तर 2021 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 21 हजार नवीन मालमत्ता आढळून आल्या होत्या. मात्र, यानंतरही शहरात नोंद नसलेल्या मोठ्या मालमत्ता असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने प्रथमच अत्याधुनिक ड्रोनव्दारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
मालमत्ता सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे सुधारीत कर आकारणी करणे, मालमत्ता करविभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरविणे यासाठी सल्लागार व सेवा पुरवठादार निवडणे यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. मे स्थापत्य कंन्सलटट इंडीया प्रा. लि. या ठेकेदाराची निविदा प्राप्त झाली.
या कामाची तीन वर्षांची मुदत असणार आहे. त्यानुसार मालमत्ता सर्वेक्षणाच्या निविदेला आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली आहे. या सर्वेक्षणातून मालमत्तांचे स्थळदर्शक नकाशांचे संगणकीकरण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेली सर्व माहिती संगणकीकृत करुन डिजीटल फोटोग्राफ सह कर मुल्यांकन संगणक आज्ञावलीमध्ये एकमेकांस मालमत्ता निहाय जोडली जाणार आहे. जेणेकरुन कर आकारणी संबंधातील करपात्र क्षेत्रफळ, नकाशा, मालमत्तेचा फोटो व कर आकारणी एकत्रीतपणे संगणक आज्ञावलीद्वारा पाहता येणार आहे.