वॉशिंग्टन- अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने उद्योगपती-मालक जेफ बेझोस यांच्यावरील व्यंगचित्र छापण्यास नकार दिल्यामुळे पुलित्झर पुरस्कार विजेत्या व्यंगचित्रकार एन. टेलनेस यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. संपादकांनी त्यांना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे.
एन. टेलनेस यांनी काढलेल्या व्यंगचित्रात वॉशिंग्टन पोस्ट दैनिकाचे मालक व अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस, मेटाचे संस्थापक मार्क झुगरबर्ग, लॉस एंजलीस टाईम्सचे पॅट्रिक सुन शियाँग आणि डिस्नेची ओळख असलेले मिकी माऊस हे पात्र राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भव्य पुतळ्यासमोर नतमस्तक होताना दाखवले आहेत. त्यांच्या हातात पैशांच्या थैल्याही आहेत. हे व्यंगचित्र छापण्यास वॉशिंग्टन पोस्टने नकार दिल्यानंतर टेलनेस यांनी राजीनामा देण्यात आला आहे. वृत्तपत्रीय स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण हा राजीनामा देत असल्याचे टेलनेस यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की, आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत व्यंगचित्राच्या बाबतीत संपादकीय सूचना मिळाल्या आहेत किंवा चर्चाही झाली आहे. मात्र मी काढलेले कोणाचेही व्यंगचित्र नाकारण्यात आले नव्हते. हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. त्यामुळे मी हा राजीनामा देत आहे. अशा पद्धतीने व्यंगचित्र नाकारणे हे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.
दरम्यान, वर्तमानपत्राची प्रतिमा जपण्यासाठी टेलनेस यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती संपादक डेव्हीड शिप्ले यांनी केली आहे.