सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावात स्वखर्चाने मतपत्रिकेद्वारे गावापुरते प्रतिरुप मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा मिळावी यासाठी केलेली मागणी फेटाळण्यात आली असून अशा प्रकारची कोणतीही शासकीय यंत्रणा उपलब्ध करुन देता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी कळवले आहे. मारकडवाडी येथील ९६,९७ व ९८ या मतदान केंद्रांवर नियमांप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली असून यापुढे कोणत्याही प्रकारे प्रक्रिया राबवता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मारकडवाडी येथील गावाने आजवरच्या निवडणुकीत शरद पवारांच्या उमेदवाराला मताधिक्य दिले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गावातून विरोधी भाजपा उमेदवाराला मताधिक्य मिळाले होते. ही गोष्ट पटली नसल्याने गावकऱ्यांनी मतपत्रिकेद्वारे प्रतिरुप मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वखर्चाने ते ही प्रक्रिया राबवणार असून निष्पक्षता जपण्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा मिळावी अशी मागणी केली होती. येत्या ३ डिसेंबरला हे प्रतिरुप मतदान होणार असून त्याबद्दल उत्सुकता आहे.