मुंबई – शिवसेनेचे (शिंदे गट) कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सत्र न्यायालयाच्या आदेशाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हान याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. न्या. श्याम चांडक यांनी दादा भुसे यांना नोटीस बजावत याचिकेची सुनावणी २५ फेब्रुवारीला निश्चित केली.
विद्यमान कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळे आपली बदनामी झाली, असा दावा करीत राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात कागदपत्रे सादर करण्याची परवानगी द्या,अशी विनंती करीत राऊत यांनी केली होती.न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली. त्या विरोधात राऊत यांनी उच्च न्यायालयाचे याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी राऊत यांच्यावतीने अॅड. यशोदीप देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने दादा भुसे यांना नोटीस बजावत भूमिका मांडण्याचे निर्देश दिले.