मुंबई-अहमदाबाद महामार्ग, घोडबंदर रस्ता आणि ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) १२२ किमी लांबीचा बडोदा-मुंबई द्रुतगती मार्ग बांधत आहे. या मार्गाचा अखेरचा टप्पा मोरबे (अंबरनाथ तालुका) येथे संपतो. मोरबेच्या आधी माथेरानच्या डोंगराखाली २५ मीटर रुंदीचा व १० मीटर उंचीचा बोगदा तयार केला आहे. हा द्रुतगती महामार्ग ४ अधिक ४ असा आठ पदरी आहे. त्यामुळेच हा बोगदादेखील त्यानुसारच बांधण्यात आला. तो २५ मीटर रुंदीचा आहे. त्याची उंची १० मीटर आहे. त्याखेरीज या बोगद्यात प्रत्येकी ५०० मीटर अंतरावर एका बाजूने दुसऱ्या बाजूने जाण्यासाठीचा मार्ग आहे. त्याला ‘क्रॉस कनेक्टर’ संबोधले जाते. असे सात ‘क्रॉस कनेक्टर’ तिथे बांधण्यात आले आहेत बोगद्याची लांबी ४.१७४ किमी असून, त्याचे खोदकाम १६ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. बसाल्ट पद्धतीचा खडक फोडून हे काम करण्यात आले. हा रस्ता जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणारा असल्याने मोठ्या कंटेनर आणि ट्रकच्या वाहतुकीसाठी ५.५० मीटर उंची असलेला बोगदा तयार करण्यात आला आहे. बोगद्यात चार ठिकाणी व्हेंटिलेशन पंखे आहेत. एनएचएआयने पावसाळ्यापूर्वी सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
माथेरानच्या हिरव्यागार डोंगरातून बडोद्यासाठी वाट
