कराड-सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या गोंदवले बुद्रुक येथे भारतीय उपखंडातील सर्वात विषारी व दुर्मिळ असा ‘पोवळा’ साप आढळला आहे. शार्दूल कट्टे यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ हा साप आढळला.’स्लेन्डर कोरल स्नॅक ‘ असे शास्त्रीय नाव असलेल्या या सापास मराठीमध्ये ‘पोवळा’ साप असे म्हटले जाते.
विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा हा साप सहसा दृष्टीस पडत नाही. तो करंगळी एवढा जाड असतो. जर हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका असा इशारा देतो. पोवळा हा वाळ्यासारख्या दिसणारा व वाळ्यापेक्षा काहीसा मोठा साप आहे.या सापाचे विष मज्जा संस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे,चक्कर येणे,बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसतात. चावलेल्या भागात वेदना होतात. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. हा साप भारतातील सर्वात छोटा विषारी साप आहे.याचे शरीर फारच सडपातळ असते.गुळगुळीत खवले, काळे डोके कधी कधी डागाळलेले,तपकिरी शरीर, शेपटी जवळ काळा कडा,
चमकदार काळी शेपटी आणि निळसर खालची बाजू असते.