सातारा – जिल्ह्यातील माण तालुक्यातील वीरकरवाडी ते देवापूर या अवघ्या तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेल्या नवीन रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत.बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या या गलथान कारभाराबाबत ग्रामस्थ,प्रवाशी आणि वाहनचालकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. दरम्यान,देवापूरचे सरपंच शहाजी बाबर यांनी तर या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याला जबाबदार असणार्या अधिकाऱ्यांची चौकशी करूनच ठेकेदाराची बिले अदा करावीत,अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.
तीन महिन्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.तरीही पावसाळ्याआधीच या रस्त्यावरील डांबर उचकटून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.वीरकरवाडीच्या बाजूने असलेल्या साईडपट्या अस्ताव्यस्त झाल्या आहेत.त्यामुळे शाळकरी मुलांसह वाहन चालकांना गाडी चालविताना धोका निर्माण झाला आहे.याबाबत संबधित अधिकार्यांना तक्रारी करूनही त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.दुसरीकडे ठेकेदाराने आपले बिल काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून मग ठेकेदाराची बिले काढावीत, नाहीतर ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील,असा इशारा सरपंच शहाजी बाबर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.