सातारा- माण तालुक्यातील वरकुटे येथील बंधारा कोरडा पडला आहे.त्यातच जलसंधारण विभागाने नदीचे पाणी आटल्यावर दारे बसवली आहेत.ही शेतकर्यांची क्रूर चेष्टा असून कोणत्याही परिस्थितीत या बंधाऱ्यात आंधळी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
माण नदीवर २४ बंधारे बांधले आहेत. त्यापैकी काही कोल्हापूर पद्धतीचे तर काही भूमीगत पद्धतीचे आहेत.वरकुटे येथील काटकर वस्तीवरही गेल्या वर्षीच बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी पाणी साठवण्यासाठी बंधार्यास दारे बसवावी अशी मागणी शेतकर्यांनी केली होती. मात्र आता नदीतील पाणी आटल्यावर बंधार्यास दारे बसविली आहेत.त्यामुळे शेतकरीवर्गात संतापाची लाट पसरली आहे.या बंधार्याच्या पाण्याचा वापर वरकुटे,वाकी आणि माळवाडी येथील पिण्याच्या पाणी योजना आणि शेतीसाठी होणार आहे. पण दारे बसविल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.तरी आता जलसंधारण विभागाने आंधळी धरणातून पाणी सोडून हा बंधारा भरावा,अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.