कोल्हापूर- गेल्या काही महिन्यांपासून शक्तिपीठ महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प वादग्रस्त बनला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या महामार्गाला विरोध होत आहे. मात्र हातकणगंले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतीच्या बदलत्या भूमिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या ग्रामपंचायतीने एका सभेत विरोध आणि दुसर्या सभेत महामार्गास मंजूरी दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग वगळण्यात आला आहे. पण याबाबत राज्य शासनाची भूमिका संदिग्ध दिसत आहे. त्यातच प्रजासत्ताकदिनी माणगावच्या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनी शक्तिपीठ महामार्ग व्हावा, असा ठराव केल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. याआधी शक्तिपीठ महामार्ग रद्द बाबत ठराव करण्यात आला होता. आता अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या दुहेरी भूमिकेबाबत शेतकर्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याआधी गावातील बाधित शेतकऱ्यांनी जून २०२४ मध्ये ग्रामपंचायतीची विशेष सभा घेत शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली होती. तसेच अशा आशयाचे निवेदन दिले होते.
याप्रसंगी उपसरपंच विद्या जोग व माजी उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य नितीन कांबळे, मनोज आदाण्णा यांनी निवेदन स्वीकारत शक्तिपीठ महामार्गास माणगांव ग्रामस्थाचा विरोध राहील. तसा ग्रामपंचायत सभेत ठराव करत असल्याचे आश्वासन शेतकरी आंदोलक यांना दिले होते. मात्र आता २६ जानेवारी रोजी झाालेल्या ग्रामसभेत शक्तिपीठ महामार्ग व्हावा, असा ठराव रेटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे अभिषेक मगदूम, वृषभ पाटील, अंकुश चव्हाण यासह बाधित शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
माणगावात शक्तिपीठ महामार्गाला आधी विरोध आणि आता पाठिंबा
