उरण
उरण तालुक्यातील केगाव, माणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर एक मोठ्या आकाराचा मृत डॉल्फिन मासा आढळून आला. या किनाऱ्यावर अनेक कुटूंब मृत व्यक्तींच्या दशक्रिया करण्यासाठी येतात. कोप्रोली येथील एका कुटुंबाला फेरफटका मारताना हा मृत डॉल्फिन दिसला. माणकेश्वर स्मशानभूमीच्या परिसरात या मृत डॉल्फिनला बरेच दिवस झाल्याने आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा मासा साधारण सात ते आठ फूट लांबीचा असून त्याच्या शेपटीकडे मोठी जखम झाली आहे.
एखाद्या मालवाहू जहाजाच्या पंख्यामुळे ही जखम झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला. याबाबत उरण वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांना विचारणा केली असता, आम्हाला याबाबत कल्पना नाही. मात्र, याची माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मृत डॉल्फिनला तशाच अवस्थेत ठेवल्याने स्थानिक नागरिक, माणकेश्वर समुद्रकिनारी दशक्रिया विधीला येणारे नागरिक व पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.