पुणे- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचे नाव अद्याप जाहीर केले नाही. शपथविधीला विलंब होत असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी भाजपामधून वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगत आहे. यामध्ये पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचेही नाव अनपेक्षितरीत्या चर्चेत आले आहे. मात्र आता स्वत: मोहोळ यांनी ही एक्स पोस्ट करून ही चर्चा फेटाळली आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.