मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, जोशी यांची प्रकृती खालावल्याचे समजताच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते. तसेच ठाकरे गटाच्या इतर काही नेत्यांनीही रुग्णालयात जाऊन जोशींच्या प्रकृतीची विचारपूस केली . दरम्यान मनोहर जोशींच्या प्रकृतीसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल, असे हिंदुजा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
मनोहर जोशी हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुखांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत नगरसेवक, महापौर, आमदार , खासदार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. एनडीए सरकारच्या काळात ते लोकसभेचे सभापती आणि अवजड उद्योग खात्याचे मंत्रीही होते. गेल्या काही काळापासून प्रकृती साथ देत नसल्याने ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल
