छत्रपती संभाजीनगर- ज्येष्ठ विचारवंत, प्रख्यात वकील आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिव दुपारी ३ वाजता जयनगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणले आणि सायंकाळी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर प्रतापनगर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
न्यायाधीश होण्यापूर्वी नरेंद्र चपळगावकर १९६१-६२ मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. त्यांनी वकिली क्षेत्रात आपला ठसा सोडला आणि १९७९ साली मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. त्यानंतर ते १९९० ते १९९९ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. नरेंद्र चपळगावकर यांना विविध साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने राम शेवाळकर पुरस्कार देण्यात आला, तसेच २०२२ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. त्याशिवाय, “तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ” या पुस्तकासाठी त्यांना भैरुरतन दमाणी पुरस्कार देखील मिळाला. चपळगावकर यांनी ‘संघर्ष आणि शहाणपण’, ‘दीपमाळ’, ‘आठवणीतले दिवस’ आणि ‘कायदा, माणूस’ यांसारखी अनेक पुस्तके लिहिली. जन्म बीडमध्ये झाला आणि त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण बीडमध्ये पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण अमरावती आणि औरंगाबादमध्ये घेतल्यानंतर त्यांनी लातूर इथल्या दयानंद महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले.
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
