बंगळुरू – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री व भजपाचे ज्येष्ठ नेते एस.एम. कृष्णा यांनी आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास बंगळुरू येथील निवासस्थानी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून एस.एम. कृष्णा आजारी होते.
कृष्णा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करत आदेश जारी केला आहे. त्यानुसार उद्या राज्यात सुट्टी जाहीर केली आहे.तर एस. एम. कृष्णा यांच्या सन्मानार्थ प्रमुख सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला. पुढील तीन दिवस राज्यात कोणतेही शासकीय अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. त्यांच्या मूळ गावी मद्दूरमध्ये सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर बंगळूरमध्ये उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या सायंकाळी ४ वाजता कृष्णा यांच्यावर मद्दूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत एक्सवर लिहले की,एस.एम. कृष्णा हे एक असामान्य नेते होते. इतरांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच अथक परिश्रम घेतले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी भर दिला.
एसएम कृष्णा यांचा जन्म १९३२ मध्ये मद्दुर तालुक्यातील सोमनहल्ली गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव सोमनहल्ली मल्लैया कृष्णा असे होते. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. १९६० च्या सुमारास त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६२ मध्ये मद्दुर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षात प्रवेश करून १९६८ मध्ये मंड्या लोकसभा पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर कृष्णा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि १९७१ मध्ये मंड्या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक जिंकली. कर्नाटकातील मंड्या येथून कृष्णा अनेकदा खासदार म्हणून निवडून आले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात त्यांनी उद्योग आणि वित्त राज्यमंत्री म्हणून काम केले होते. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद भूषवले. २००४ ते २००८ या काळात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. २००९ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी परराष्ट्र मंत्रालय सांभाळले. मार्च २०१७ मध्ये कृष्णा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०२३ मध्ये एसएम कृष्णा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. जानेवारी २०२३ मध्येकृष्णा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते.